चंचुप्रवेश: भाग १


"दरवर्षी एवढी मुलं शाळा सोडतात की शिक्षक त्यानेच हैराण होतात. मुलींना पैशाअभावी शाळा सोडावी लागते. त्यांची तर आजही १५-१६ व्या वर्षी लग्न लावून दिली जातायत. मुलांचंही तेच होतं. इंग्रजी समजत नाही, गणित कळत नाही म्हणून स्वतःचीच लाज वाटून मुलं शाळेपासून दुरावतात. अशी मुलं मग घरातून निघतात आणि शाळेत येण्याच्या ऐवजी डोंगरातल्या रानात पळतात. शाळेत त्यांचे एकामागून एक खाडे होत राहतात. एक विद्यार्थी शाळेपासून दूर होताना एकटाच होत नाही तर इतरही विद्यार्थ्यांना तो आकर्षित करून घेउन जातो. कधीकधी फारच गैरहजेरी वाढल्यावर शिक्षक त्यांच्या गावात जातात तेव्हा अगोदरच बातमी लागून ही पोरं दूर डोंगरात पळतात. शिक्षकांनी तरी काय करावं मग? बाकी महाविद्यालयीन शिक्षणापासून तर इथले विद्यार्थी फारच दूर आहेत. त्याबद्दल बोललेलंच बरं…."

चार वर्षांपूर्वी पालघर तालुक्यामधल्या एका शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापकांच्या घरी आम्ही बसलो होतो. तेव्हा पाड्यावरच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्या गुरुजींनी काढलेले हे उद्गार आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सेवा सहयोग फाऊंडेशन पाऊल ठेवत असताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी काही अनुभवी शिक्षकांशी, निवडक गावांतील ग्रामस्थांशी चर्चा केल्या. दुर्गम आदिवासी पाड्यांवरील शिक्षणाची स्थिती समजावून घेतली. यावेळी वसई, पालघर, डहाणू, वाडा इत्यादी तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये फिरून शिक्षणाची तात्कालीन स्थिती पाहता आली.

निश्चितच पाड्यावरच्या मुलांना पाहताना त्यांचं मागासलेपण, त्यांची बिकट आर्थिक, कौटुंबिक स्थिती हीच आपल्या डोळ्यात आणि मनात भरते. आपसूकच मग त्यांच्याविषयी आपल्या मनात कणव निर्माण होते. आपल्याला वाटू लागतं की यांना मदतीची नितांत 'आवश्यकता' आहे. पण बऱ्याचदा ही मदतीची 'आपल्याला वाटणारी आवश्यकता' त्या समोरच्या व्यक्तीच्या 'गरजेची' नसतेही! पण ही 'आवश्यकता' आपल्या मनातल्या कळकळीतून जन्माला आलेली असते.

पाड्यावरच्या विद्यार्थ्यांना मदतीची नाही तर मैत्रीची, सहकार्याची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. आणि हाच धागा पकडून पुणे, मुंबई, नवी मुंबईप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सेवा सहयोग फाऊंडेशन मार्फत 'समुत्कर्ष-अभ्यासिका' प्रकल्पाचा पाया घातला गेला.

वसई, वाडा, सफाळे, बोईसर, डहाणू परिसरातील ३५ दुर्गम पाड्यांवर अभ्यासिका स्थापन करण्यात आल्या. पाड्यामधलीच एखादी १० वी, १२ वी पास झालेली ताई अभ्यासिका शिक्षक म्हणून काम पाहू लागली. दररोज दोन तास पाड्यातील मुलांना समाजमंदिरात, शाळेच्या वर्गात किंवा आपल्याच घराच्या ओट्यावर एकत्र बसवून त्यांचा अभ्यास घेऊ लागली, त्यांचे खेळ घेऊ लागली.

सुरुवातीच्या काळापासूनच गावातील मुलींची उपस्थिती ही अभ्यासिकेत लक्षणीय राहिली. मात्र मुलं काही अभ्यासिकेत बसायला येईनात. शाळेत देखील निरीच्छेने जाणारी, लिहिता वाचता येत नसल्यामुळे मनात प्रचंड न्यूनगंड असणारी मुलं अभ्यासिकेपासून लांबच राहत होती. मात्र हळूहळू मुलांना सामावून घेण्यासाठी अभ्यासिकेमार्फत विविध खेळ आणि उपक्रम घेण्यात येऊ लागले. खेळांमुळे आणि उपक्रमांमुळे हळूहळू मुले अभ्यासिकेत पाउल ठेऊ लागली. बहुतेक मुलामुलींना अगदी अक्षर ओळखणे देखील कठीण जाई. या मुलांवर काम करण्यासाठी त्यांची उपस्थिती नियमित होणे गरजेचे होते. याकरिता पालक सभा, गृहभेटी, शाळा भेटी यांचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबतच पालक, शाळा शिक्षक, ग्रामपंचायत यांनाही अभ्यासिकांचे महत्त्व पटवून देण्यात आले. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे यांमुळे गावातील शैक्षणिक-सांस्कृतिक वातावरण हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली. दर वर्षी मिळणाऱ्या स्कूल कीट मुळे आणि अभ्यासिकेतील खेळीमेळीच्या वातावरणात होणाऱ्या अभ्यासामुळे मुले नियमित शाळेत जाऊ लागली. अभ्यासिका शिक्षकामार्फत आणि गावातील, शहरांतील स्वयंसेवकांमार्फत मुलांना कठीण वाटणारे विषय शिकवण्यात येऊ लागले. मुलांना हळूहळू बाहेरच्या जगाची ओळख होऊ लागली. शिवाय स्वतःची एक नवीन ओळख त्यांना सापडू लागली.

या सर्व गेल्या - वर्षांतला एकत्रित परिणाम हळूहळू आता स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. सन २०१९-२० मध्ये इयत्ता १० वीला बसलेल्या पालघर मधील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांचा निकाल १०० % लागला. जिथे गावातील मुले नववी-दहावीतच शाळा सोडत होती, जिथे गावातील १० वीला बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २५% विद्यार्थीही उत्तीर्ण होत नव्हते तिथे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पेणंद, दारशेत, दहीवाळे,पाटीलपाडा-शिगाव, पाटीलपाडा-करवाळे यांसारख्या गावांचा निकाल पहिल्यांदाच १०० % लागला. उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आत्मविश्वासाने सरसावले आहेत. गेली तीन वर्षे या गावांमध्ये कुणीही शाळा मधूनच सोडलेली नाही. समुत्कर्षच्या दिशेने आता गावातील विद्यार्थ्यांची वाटचाल सुरु झाली आहे.

अभ्यासिकेच्या माध्यमातून गावात आणि पाड्यांवर सेवा सहयोगचा चंचुप्रवेश झाला असे म्हणता येईल. सुरुवातीच्या वर्षात जेव्हा अभ्यासिका सुरु झाल्या तेव्हा या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली जागा उपलब्ध करून देणे, अभ्यासाचे चांगले वातावरण पाड्यावर तयार करणे, रोज विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसण्याची सवय लावणे, विविध वैयक्तिक आणि सांघिक उपक्रम स्पर्धा घेउन त्यांच्या कलागुणांना चालना देणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. हे सर्व उद्देश सफल होण्याकरिता सगळेच समन्वयक आणि शिक्षक कसोशीने प्रयत्न करत होते; किंबहुना ते यशस्वी होत होते. परंतु पाड्यावरुन दोन प्रकारचे विद्यार्थी अजूनही अभ्यासिकेवर येत नव्हते. एक - ज्यांना अभ्यासाची अजिबात आवड नाही. आणि दोन - ज्यांना घरच्या कामांमुळे अभ्यासिकेत येणे शक्य होत नाही.

दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांवर आम्ही तडक काम सुरू केले. त्यांच्या पालकांच्या भेटी घेण्यात आल्या. अभ्यासासिकेत त्यांच्या पाल्याने येण्याचे महत्त्व समजावून सांगितले. यातूनच पुढे पालक सभेची आवश्यकता आणि त्याचे महत्त्व आम्हाला कळायला लागले. पालकांशी संपर्क करताना प्रभावी संवादाचे महत्त्व आम्ही हळूहळू शिकत गेलो. विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी मैत्रीचं नातं निर्माण करण्यासाठी अविनाश नम, आकाश वनगा, बळीराम कवळी यांसारख्या ग्रामीण समन्वयकांनी कसोशीने प्रयत्न केले. या सर्वांनी पालकांना समजावण्याची कामगिरी शिताफीने केली. अतिशय संयमाने आपली भूमिका लोकांसमोर मांडली. पालकांनी त्यांचे म्हणणे डावलले नाही आणि अभ्यासिकेच्या वेळेत घरात भात रांधणारी, पाणी भरणारी, शेतात किंवा वाडीत राबणारी मुले अभ्यासिकेत दिसू लागली.

भाग एक समाप्त.


Comments